काशिनाथ ते दाते सर.. एका शेतमजुराच्या मुलाचा प्रवास..

 काशिनाथ ते दाते सर.. एका शेतमजुराच्या मुलाचा प्रवास..



कण्हेर आणि पोखरी ही पारनेर तालुक्याच्या उत्तरेला एकमेकांपासून ४ किमी अंतरावर असणारी दोन स्वतंत्र गावे. पोखरी हे यातील सर्वात मोठे गाव परंतु भारतासह नेपाळमध्ये सुध्दा पोखरी नावाची अनेक गावे असल्याने बऱ्याचदा नेमकी कोणती पोखरी हा प्रश्न दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांना नेहमी पडायचा. मग आपसूकच पोखरीच्या पुढे कण्हेर लागून कण्हेर-पोखरी अशी ओळख तयार झाली आणि आजही ती तशीच आहे. दुष्काळ या भागामध्ये पाचवीला पुजलेला त्यामुळे या भागातील लोक नोकरी आणि व्यवसायासाठी पुणे-मुंबईला जात असत आणि मजुरी, हमाली, मेंढीपालन करून आपला उदरनिर्वाह करत. मांडओहळ धरण झाल्याने धरण परिसरातील बरीचशी जमीन बागायती बनली परंतु दोनवेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या शेतकरी मजुरांच्या शेतात पाणी येणे ही अशक्यप्राय बाब. मग यातूनच सुरु झाला कण्हेर-पोखरी भागातून एक-एक हिरा जन्माला येण्याचा प्रवास. 

कण्हेरपासून पूर्वेला एक किमी अंतरावर गाढवेझाप नावाची छोटी वस्ती आहे. या वस्तीवर सोनाबाई आणि महादू यांच्या घरात काशिनाथ यांचा जन्म झाला. दाते दाम्पत्याला एकूण ७ मुले यातील काशिनाथ हा सर्वात मोठा. लहानपणी आईवडील उपसत असलेले कष्ट पाहून काशिनाथ यांचे मन बैचेन व्हायचे पण अठराविश्व दारिद्र,  सोबतच पाचवीला पुजलेला सततचा दुष्काळ यामुळे त्यांचाही नाईलाज व्हायचा. आपला मुलगा शिकून साहेब झाला पाहिजे. त्याने आपल्यासारखं मातीमोल आयुष्य जगलं नाही पाहिजे असे दाते दाम्पत्याला सतत वाटे. कण्हेर गावामध्ये चौथी पर्यंत शाळा होती. आईवडिलांच्याबरोबर मोलमजुरी करून काशिनाथ यांनी आपले चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. चौथीनंतर पुढे काय हा प्रश्न आता उभा राहिला. शिक्षणाची गोडी लागलेले काशिनाथ मागे हटले नाही. कण्हेरपासून १५ किमी अंतरावरील कर्जुले हर्या येथे तब्बल १६ किमी पायी चालत जाऊन त्यांनी आपले शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनंतर काशिनाथ यांच्यातील धडपड पाहून कर्जुले हर्या येथील कोकाटे परिवाराने आपल्या घरी त्यांना ठेवून घेतले. तेथे राहून त्यांनी आपले सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना १९७२ भयाण दुष्काळ पडला याकाळात अन्न-पाण्यावाचून माणसे, जनावरे मरत होती. आता शिक्षण थांबणार की काय? असे चित्र निर्माण झाले. पण शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून दुष्काळी भागात विविध कामे सुरु केले. या कामावर मजुरीसाठी दररोज जाऊन काशिनाथ यांनी आपला प्रश्न सोडविला. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग. शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्याने पुढे आणे येथे नातेवाईकांकडे राहून मेट्रिक पर्यंतचे शिक्षण आणि कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून दादा पाटील महविद्यालय, कर्जत आणि न्यू आर्ट्स कॉलेज, अहमदनगर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बी.ए. इंग्लिश झालेले असल्याने त्याकाळी कोठेही सहज नोकरी मिळालीही असती पण वेगळीच वाट चोखाळण्याचा छंद असल्याने पारनेरमध्ये टायपिंग इंस्टिट्यूटची सुरवात दाते यांनी केली आणि सुरु झाला काशिनाथ ते दाते सर एका शेतमजुराच्या मुलाचा प्रवास..

घराच्या बिकट परिस्थिमुळे आपल्या इतर मुलांना शिक्षण देता आले नाही अशी खंत सोनाबाई आणि महादू दाम्पत्य लोकांकडे नेहमी बोलून दाखवत. आपल्या आईवडिलांची अपुरी इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी दाते सर यांनी उचलली लहान भाऊ रामदास,  सुभाष आणि बाबासाहेब यांना त्यांनी शिक्षण दिले. आईवडिलांनी आपल्या शिक्षणासाठी उर्वरित तीन भावांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला आहे असे दाते सर यांना नेहमी वाटे त्यामुळे आपल्या तीन भावांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी दाते सर यांनी पत्नी सुमनताईच्या सहकार्यातून सर्व भावंडांची घरे उभी केली आणि त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सहकार्य केले. आईवडिल आणि भावंडांच्या त्यागातून काशिनाथचे दाते सर झाले तर सुमनताईच्या त्यागातून दाते कुटुंबीय उभे राहिले. पत्नीविषयी कृतज्ञता व्यक्त करताना दाते सर म्हणतात सुमनचे माझ्यावर दोन पिढ्यांचे उपकार आहेत. तिचे वडील सिताराम कापसे यांच्या मदतीने मी उच्च शिक्षण घेतले तर सुमनच्या मदतीने आमची दुसरी पिढी उच्च शिक्षित झाली. 

पारनेरमध्ये टायपिंग इंस्टिट्यूट ऐन भरात होती. काशिनाथ दाते यांना टायपिंग इंस्टिट्यूटवाले दाते सर म्हणून पंचक्रोशीत लोक ओळखू लागले आणि दाते सर ही उपाधी त्यांना चिटकली ती कायमचीच.. आजूबाजूच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर ओळखी वाढल्याने १९७९ मध्ये दाते सर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदा सहभाग घेत आपल्या राजकीय कार्याचा श्रीगणेशा केला आणि विकासापासून कोसोदूर असलेल्या कण्हेर-पोखरी भागात एक आशेचा किरण दिसू लागला. मुळचा शेतकरी पिंड असल्याने १९८५ साली पहिल्यांदा पारनेर साखर कारखान्याची निवडणूक जिंकून विजयी झाले. वासुंदे गावाचे रहिवासी स्व. वंसतराव झावरे यांनी दाते यांचे संघटन कौशल्य ओळखून त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रचाराची जबाबदारी दिली. आपल्या झंजावाती प्रचार सभेने त्यांनी तालुक्याच्या काना-कोपरा पिंजून काढला. १९९५ मध्ये स्व. वसंतराव झावरे पारनेर तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी आपला विश्वासू सहकारी दाते सर यांना तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले. १९७९ पासून राजकारणाच्या नौकेत बसलेल्या दाते सर यांनी पुढे तालुका देखरेख संघ, १९९७ मध्ये कर्जुले हर्या गणातून पंचायत समिती सदस्य, पारनेर बाजार समितीचे सभापती पद, पारनेर जिल्हापरिषद गटातून सदस्य, टाकळी जिल्हापरिषद गटातून सदस्य आणि सध्या अहमदनगर जिल्हापरिषदेमध्ये बांधकाम आणि कृषी समितीचे सभापती म्हणून अशी मोठी मजल मारली.  कॉंग्रेस -राष्ट्रवादी-शिवसेना-राष्ट्रवादी-शिवसेना असा ४२ वर्षाचा राजकीय प्रवास असलेल्या दाते सरांची राजकारणातील भूमिका कायमच किंगमेकर म्हणूनच राहिली आहे. आपल्या पदाचा फायदा हा सर्व सामान्य जनतेला झाला पाहिजे या तळमळीतून त्यांनी कण्हेर-पोखरी परिसरासह तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा केला. दाते सर म्हणजेच विकास हे नवे समीकरणच अपोआप तयार झाले. आमचे दाते सर तालुक्याचे नेते झाले परंतु त्यांना तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी राज्याच्या विधिमंडळात अद्याप मिळालेली नाही याची एकच हुरहूर त्यांच्या चाहत्यांना कायम आहे. 

स्व. माजी आमदार बाबासाहेब ठुबे, स्व. माजी आमदार वसंतराव झावरे, माजी विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या सोबत कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या दाते सर यांचे राजकारणाबरोबरच समाजकारण, शिक्षण याच्याकडे दाते सर यांचे विशेष लक्ष राहिले. पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या १७ शाखांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती दिली. अहमदनगर जिल्ह्यासह पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील एक विश्वसनीय पतसंस्था म्हणून पारनेर ग्रामीणकडे पहिले जाते. आपल्याला १६ किमी अंतरावर पायी चालत जावे लागले. शिक्षणाची सोय नसल्याने आपली चार भावंडे शिकू शकली नाही याची खंत मनाशी असल्याने दाते सर यांनी १९९६ मध्ये रंगदास स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ, पारनेर या शिक्षण संस्थेची स्थापना केली या संस्थचे गुरवेवाडी येथे शामजीबाबा हे एक विद्यालय असून दाते सर यांचा लहान भाऊ बाबासाहेब हे या विद्यालयाचे सध्या मुख्याध्यापक आहेत. सध्या कण्हेर-गुरवेवाडी परिसरातील ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी या विद्यालयात शिक्षण घेतात. या विद्यालयामध्ये शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित झाले आहेत. कण्हेर-पोखरी परिसरातील मुले-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबर त्यांना उच्च शिक्षणामध्ये सुध्दा दाते सर यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे. कण्हेर-पोखरी परिसराच्या विकासासोबतच तालुक्याच्या जडघडणीमध्ये दाते सर यांचे फार मोठे योगदान आहे. अश्या निस्वार्थी नेत्याला, कार्यकर्त्याला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.  

प्रा. डॉ. सुभाष कारंडे, 

मु. धनगरवाडा पो. पोखरी, ता. पारनेर 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अनवट सातारा भाग - २ : साताऱ्याचे ॲमेझॉन काठी-अवसरी

युद्ध नको बुद्ध हवा!

दरड दुर्घटनेतील बळी? नव्हे सरकारी अनास्थेचे बळी!