भारतातील सर्वात मोठा बेसाल्ट खडकातील नैसर्गिक पूल (शिलासेतु)
भारतातील सर्वात मोठा बेसाल्ट खडकातील नैसर्गिक पूल (शिलासेतु) आणे घाट, ता. जुन्नर जि. पुणे
नगर - कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ ने प्रवास करत असताना बेल्हे हे आठवडी बाजाराचे ठिकाण सोडल्यानंतर गूळूंचवाडी हे छोटे गाव लागते. या गावापासून सुरू होतो आणे घाट. या घाटातील दुसर्या वळणावर छोटेसे गणेश मंदिर आहे. या मंदिरापासून एक पाऊल वाट दरीकडे जाते. या खोल दरीत मळगंगा देवीचे टुमदार मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारी आपल्या नजरेस पडतो. बेसाल्ट खडकातील नैसर्गिक पूल. याला शिलासेतु असेही म्हणतात. लाव्हारसापासून दख्खनच्या पठाराची निर्मिती होत असताना महाकाय खडक दरीत आडवा तयार झाला. दरीत आडव्या आलेल्या खडकाने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवून बांध तयार केला. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरलेला महाकाय खडक फोडण्याच्या कार्याला पाण्याने हळूहळू सुरवात केली. अन अखेर खडकाच्या खाली छोटेसे छिद्र पाडून पाण्याने त्याच्याखालून आपली वाट अखेर काढलीच. हजारो वर्षांपासून खडक आणि त्याच्याखालून वाहणार्या धो-धो वहाणार्या पाण्याच्या धारेने खडकाच्या खाली साधारणपणे 10 मी उंचीचा आणि 22 मी लांबीचा शिलासेतू बनविला. आजही या शिलासेतूची लांबी आणि उंची वाढवतच आहे. भविष्यात याचे संवर्धन करण्यासोबत पर्यटकांची पावले याकडे वळविण्यासाठी विशेष उपाययोजना आवश्यक आहे.
अनेक जण या शिलासेतूला भारतातील सर्वात मोठा नैसर्गिक पूल म्हणुन ओळखतात. शिलासेतूसोबत, मळगंगा देवीचे मंदिर, पावसाळ्यात वहाणारे छोटे छोटे धबधबे विशेष आकर्षण केंद्र आहे. निसर्ग संपन्न पर्यटनाची मुक्त उधळण असणार्या जुन्नर तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी ही एक बाब निश्चित आपल्या पाऊलांना तिकडे घेऊन जाईल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
डॉ. सुभाष कारंडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा