अनवट सातारा भाग - २ : साताऱ्याचे ॲमेझॉन काठी-अवसरी

 साताऱ्याचे ॲमेझॉन  काठी-अवसरी




नजर पोहचेल तिकडे घनदाट जंगल, दऱ्या खोऱ्यांमध्ये पसरलेले विभिन्न रंगाचे अथांग पाणी, ऑक्सिजनचा मुबलक साठा, प्रदूषणाचा लवलेशही नाही, पाण्यात सूर मारून मासा पकडून वर झेप घेणारे पक्षी, समृद्ध जैवविविधतेसह अतुलनीय सौंदर्य, ढगाला गवसणी घालणाऱ्या पर्वतरांगा हे काय ॲमेझॉनचे वर्णन नाही. हे तर आहे आपल्या साताऱ्यातच. पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठाराच्या छायेत, शिवसागर जलाशय आणि कोयना अभयारण्याच्या कुशीत प्रत्येकाला साद घालणारी हे दोन गावे म्हणजे काठी आणि अवसरी. पाटणपासून २९ कि.मी. तर साताऱ्यापासून ४६ किमी अंतरावर ही दोन गावे वसलेली आहेत. तसेच कोयना धरणापासून हे अंतर ११ किमी असून लाँचने सुध्दा या परिसरात येऊन फेरफटका मारता येतो.




सातारा - गजवडी- ठोसेघर - चाळकेवाडी - वनकुसवडे - काठीटेक - अवसरी - काठी असा प्रवास करून  सातार्‍याच्या ॲमेझॉनला पोहोचता येते. साताऱ्याहून जाताना वाटेतच समर्थांचा सज्जनगड, ठोसेघरचा उंच दरीतून कोसळणारा मोठा आणि त्याच्याच वर असलेला छोटा धबधबा, चाळकेवाडी - वनकुसवडे पठारावरील बहरलेली रंगबेरंगी फुले, आशिया खंडातील सर्वात मोठ्या पवनऊर्जा प्रकल्पाच्या पंख्यांचा सू-सू करणारा आवाज, सोबतीला घोंघावणारा वारा आणि धोधो कोसळणारा पाऊस अंगावर झेलत घेऊन निसर्गाच्या संगतीत चिंब भिजण्याचा आनंद घेत दाट धुक्यातून वाट काढत आपल्याला प्रवास करावा लागतो. चाळकेवाडी - वनकुसवडे पठारावरून १३ किमीचा प्रवास केल्यानंतर पठारावरच उतरत्या छपराचे आणि शेवाळलेल्या भिंतींचे काठीटेक हे गाव उजव्या हाताला लागते. या गावातून उजवीकडे वळून आपल्याला काठी येथे पोहचता येते. पाटण येथून पाटण - घाणबी - काठीटेक - काठी असा २९ कि.मी. प्रवास करून आपल्याला येथे पोचता येते. 

काठीटेक ते काठी हे अंतर ०४ किमी असून रस्ता लहान असला तरी पक्का आणि सुस्थितीत असल्याने १० मिनिटात आपल्याला तेथे पोहचता येते. काठी येथून आपल्याला कोयना धरणाचे विहमंग दृश्य डोळ्यात साठवता येते. वातावरण स्वच्छ असेल तर येथूनच सातारा, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या तीनही तालुक्याचा निसर्ग अनुभवता येतो. येथे ऊन-पावसाच खेळ चालू असताना त्याची मजा काही औरच असते. सकाळी डोंगराच्या आडून डोकावणाऱ्या आणि सायंकाळच्या वेळेला डोंगराच्या आड लपणाऱ्या सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहताना ही भूमी स्वर्गाहूनही सुंदर वाटल्याशिवाय राहत नाही. येथील के-२ पॉइंट कायम पर्टयटकांचे आकर्षण ठरत आहे. काठीला जाण्यापूर्वी वाटेत अवसरी हे छोटेसे खेडे गाव लागते. हे गाव काठी गावाचाच एक भाग असून येथूनही निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवता येते. 





स्थानिक ग्रामस्थ आणि काही व्यवसायिक यांनी याठिकाणी होम स्टे, कॉटेज आणि रिसोर्ट यांची निर्मिती केली असल्याने मर्यादित संख्येने पर्यटकांच्या जेवणाची व मुक्कामाची सोय होते, परंतु अप्रतिम सौंदर्य असल्याला या ठिकाणी महाबळेश्वर सारख्या पर्यावरणपूरक पर्यटन सुविधा विकसित जर केल्या तर साहजिकच महाबळेश्वर-पाचगणी येथे होणारी गर्दी कमी होऊन तेथील पर्यावरणाची हानी टाळता येऊ शकते. तसेच मागासलेला पाटण तालुक्यातील जनतेला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. ठोसेघर, कासच्या तुडूंब गर्दीला एक नवा पर्याय नक्कीच मिळेल आणि सोबत धारेश्वर येथील गुहा व दातेगड किल्लाही पाहण्याची संधीही पर्यटकांना मिळेल.


डॉ. सुभाष कारंडे,

सहाय्यक प्राध्यापक, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युद्ध नको बुद्ध हवा!

दरड दुर्घटनेतील बळी? नव्हे सरकारी अनास्थेचे बळी!