अनवट सातारा भाग - १ : साताऱ्याचा दुधसागर उंबरी धबधबा

साताऱ्याचा दुधसागर उंबरी धबधबा

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केल्याने शहरातील पर्यटकांसोबतच ग्रामीण भागातील पर्यटक विविध ठिकाणांना वर्षभर भेटी देत असतात. पावसाळ्यात धो-धो कोसळणारा पाऊस, अंगाला झोंबणारा गार वारा, सड्यावर फुललेली रंगीबेरंगी फुले, स्वर्ग सुखाची अनुभूति देणारे येथील धबधबे आणि हिरवेगार डोळ्यांचे पारणे फेडणारे सह्याद्रीचे डोंगर यांचा याच देही याच डोळा आनंद लूटण्यासाठी महाराष्ट्रभरातील असंख्य पर्यटकांची पाऊले साताऱ्याकडे वळतात. भारतातील सर्वात उंच धबधबा म्हणून वजराई धबधब्याची ओळख महाराष्ट्रासह भारतात सर्वदूर पसरली असल्याने कास पठाराला भेट देणारे अनेक पर्यटक येथे आवर्जून भेट देतात. याचबरोबर दोन टप्प्यांमध्ये म्हणजेच लहान आणि मोठा असा बाराही महीने कोसळणारा ठोसेघर धबधबा, कोयना धरणाच्या जवळील ओझर्डे धबधबा, अलीकडेच पर्यटकांचे आकर्षण ठरत असलेला एकीव धबधबा, महाबळेश्वर आणि पाचगणीला येणाऱ्या सर्व पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारा भिलार आणि लिंगमळा धबधबा, वाऱ्याच्या वेगामुळे पश्चिमेकडे जाणारे पाणी पुन्हा पूर्वेकडे फेकलं जातं आणि उंच आकाशात उडाल्यामुळे तयार झालेला उलटा अर्थात सडावाघापूरचा रिव्हर्स धबधबा येथे प्रत्येक पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहते. यासह नेहमीच्या गर्दीपासून दूर असलेले केळवली, उंबरी, भारसकाळे, मुनावळे, विजयनगर, तारळी, आरळ असे छोटे धबधबेही पर्यटकांचे आकर्षण ठरू लागले आहेत. अनेक ठिकाणीतर स्थानिक नागरिक आणि वन विभाग यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करून येथील परिसराच्या विकासासोबतच देखभाल आणि सुरक्षेच्या विशेष उपायोजना करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही पर्यटकांच्या अतिउत्साहीपनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर हुल्लडबाजीचा सहपर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे व याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी चक्क पोलिसांचा बंदोबस्त सुध्दा ठेवण्याची वेळ आली आहे.

ओसंडून वाहणारी गर्दी आणि गोंगाटापासून निवांतपणा मिळावा यासाठी पर्यटक नेहमीच्या धबधब्यांपेक्षा आडवाटेच्या धबधब्यांना अधिक पसंती देताना दिसत आहेत. यातच कासपासून ८ किमी अंतरावर उंबरीवाडीजवळील उंबरी धबधबा पर्यटकांना साक्षात गोव्यातील दुधासागर धबधब्याची अनुभूति देत आहे.

सातारा शहरापासून ३८ किमी अंतरावर हा धबधबा असून स्वत:चे वाहन असल्यास साताऱ्याकडून जाणारे पर्यटक सातारा - कास - अंधारी - उंबरीवाडी या मार्गाने येथे पोहचू शकतात. महाबळेश्वर व मेढा येथून येणाऱ्या पर्यटकांना मेढा - कुसुंबी - सह्याद्रीनगर - अंधारी - उंबरीवाडी या मार्गाने येथे पोहचता येईल तसेच महाबळेश्वर-तापोळा येथूनही पर्यटकांना फुरस - आपटी - तेटली - बामणोली - अंधारी - उंबरीवाडी या मार्गाने येथे जाता येईल. उंबरीवाडी गावामध्ये आपले वाहन पार्क करून पुढे एक किलोमीटरची पायपीट करून धबधब्यापर्यंत पोहचता येते किंवा रस्त्यावर फारसा चिखल नसेल तर थेट धबधब्याच्या पायथ्यापर्यंत पोहचता येते मात्र चिखल असेल तर आपली गाडी चिखलात अडकून पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तो धोका न पत्करलेलचा बरा.

स्वत:चे वाहन नसल्यास सातारा येथून एसटी महामंडळाच्या बसनेही अंधारी येथे उतरून साडेचार किलोमीटरची पायपीट करून येथे जाता येते. मात्र बसची संख्या मर्यादित असल्याने बसचे वेळापत्रक न पाळल्यास खासगी वाहन किंवा मिळेल त्या वाहनाने साताऱ्यास यावे लागेल. बरेचशे पर्यटक येथे येतांना सोबत आपले जेवणही घेऊन येतात परंतु स्थानिकांना याची पूर्व कल्पना देऊन जर धबधबा पाहण्यासाठी गेल्यास ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी नक्कीच मिळते. तसेच कास-बामणोली रस्त्यावर काही छोटी हॉटेल असल्याने येथेही जेवणाची चांगली सोय होते.

उंबरीवाडी गावामध्ये मंदिराजवळील मोकळ्या मैदानावर आपले वाहन पार्क केल्यानंतर अर्धा किलोमीटर दक्षिण दिशेला चालत गेल्यानंतर आपल्याला मनमोहक धबधब्याचे दर्शन होते. यानंतर पूर्वेकडे तोंड करून ३०० मीटर चालत गेल्यावर आपण धबधब्यातून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठावर पोहचतो. येथेच आपल्या चपला काढून ओढयातून मार्ग काढत धबधब्याच्या दिशेने हळूहळू वाटचाल करावी. दुरून फोटो काढले तर धबधबा आपल्याला बाहुबली चित्रपटातील दृश्यासारखा दिसतो.

उंबरी धबधबा दोन टप्प्यांमध्ये असून केवळ दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहचता येते. दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहचल्यावर उंच कड्यावरून कोसळणाऱ्या दुधासारख्या रंगाच्या पाण्याचे तुषार अंगावर झेलताना आठवड्याच्या शिनवटा क्षणात नाहीसा होतो. धबधब्याच्या प्रत्यक्ष जवळ जाऊन त्याच्या जलधारा अंगावर घेत मनसोक्त आनंद लुटण्याची संधी लहान - मोठ्यांना केवळ येथेच मिळते तेही फारसा धोका न पत्कारता. सततच्या मुसळधार पावसामुळे दगडांवर मोठ्या प्रमाणावर शेवाळ जमा झाल्याने घसरून पडण्याचा धोका असतो. परंतु हळूहळू वाट काढत मार्गक्रमण केल्यास धबधब्यापर्यंत पोहचता येते. लहान बालके आणि वृध्द व्यक्ति यांनी धबधब्यापर्यंत पोहचण्यापेक्षा दुरूनच आनंद घेतला तर पाय घसरून पडण्याचा धोका सांभावणार नाही. शक्यतो एकट्या दुकाट्याने येथे जाणे टाळावे कारण जंगली श्वापदांचा वावर या भागात नेहमीच असतो. त्यामुळे तीनचार लोकांच्या समूहाने जाणे केव्हाही उत्तमच. शिवाय ओढयातून जाताना आजूबाजूच्या पालापाचोळयात जळूही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यांच्याही पासून काळजी घेणे आवश्यक आहे. थोड्याफार प्रमाणात पायऱ्या आणि बांधून जर धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी वाट तयार केली तर गोव्यातील दुधासागर आणि अंबोलीसारखाच आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना येथे नक्कीच मिळेल. वर्ष सहलीचा आनंद लुटायला येणाऱ्या पर्यटकांना कोणताही धोका न पत्करता निसर्गाशी जवळून एकरूप व्हायचे असेल तर पावसाळ्यात उंबरी धबधब्याला एकदातरी नक्कीच भेट दिली पाहिजे. याच्याबरोबरच कास पठार, वजराई धबधबा, सह्याद्री देवराई आणि कोयना खोरे याच मार्गावर असल्याने त्याचाही आनंद सोबत घेता येईल.

डॉ. सुभाष कारंडे,

सहाय्यक प्राध्यापक, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अनवट सातारा भाग - २ : साताऱ्याचे ॲमेझॉन काठी-अवसरी

युद्ध नको बुद्ध हवा!

दरड दुर्घटनेतील बळी? नव्हे सरकारी अनास्थेचे बळी!