अनवट सातारा भाग - २ : साताऱ्याचे ॲमेझॉन काठी-अवसरी
साताऱ्याचे ॲमेझॉन काठी-अवसरी नजर पोहचेल तिकडे घनदाट जंगल, दऱ्या खोऱ्यांमध्ये पसरलेले विभिन्न रंगाचे अथांग पाणी, ऑक्सिजनचा मुबलक साठा, प्रदूषणाचा लवलेशही नाही, पाण्यात सूर मारून मासा पकडून वर झेप घेणारे पक्षी, समृद्ध जैवविविधतेसह अतुलनीय सौंदर्य, ढगाला गवसणी घालणाऱ्या पर्वतरांगा हे काय ॲमेझॉनचे वर्णन नाही. हे तर आहे आपल्या साताऱ्यातच. पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठाराच्या छायेत, शिवसागर जलाशय आणि कोयना अभयारण्याच्या कुशीत प्रत्येकाला साद घालणारी हे दोन गावे म्हणजे काठी आणि अवसरी. पाटणपासून २९ कि.मी. तर साताऱ्यापासून ४६ किमी अंतरावर ही दोन गावे वसलेली आहेत. तसेच कोयना धरणापासून हे अंतर ११ किमी असून लाँचने सुध्दा या परिसरात येऊन फेरफटका मारता येतो. सातारा - गजवडी- ठोसेघर - चाळकेवाडी - वनकुसवडे - काठीटेक - अवसरी - काठी असा प्रवास करून सातार्याच्या ॲमेझॉनला पोहोचता येते. साताऱ्याहून जाताना वाटेतच समर्थांचा सज्जनगड, ठोसेघरचा उंच दरीतून कोसळणारा मोठा आणि त्याच्याच वर असलेला छोटा धबधबा, चाळकेवाडी - वनकुसवडे पठारावरील बहरलेली रंगबेरंगी फुले, आशिया खंडातील सर्वात मोठ्या पवनऊर्ज...